31/10/2026
*अंबाजोगाई येथे हिमोग्लोबिनोपॅथी डे केअर सेंटरचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन*
*हिमोफिलिया रुग्णांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून केंद्राचे लोकार्पण; आयुक्त मा. संजय काटकर यांच्याकडून आरोग्य सेवांचा व प्रशासकीय कामकाजाचा आढावा*
*अंबाजोगाई, दि. ३० ऑक्टोबर २०२६ :* हिमोग्लोबिनोपॅथी व हिमोफिलिया रुग्णांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई येथे हिमोग्लोबिनोपॅथी डे केअर सेंटरचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. संजय काटकर, आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मा. डॉ. सवई, संचालक, सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर; मा. डॉ. सतीषकुमार सोळंके, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, लातूर; मा. डॉ. संतोष कडले, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, संभाजीनगर; डॉ. अरुणा दहिफळे, वैद्यकीय अधीक्षक, वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र, अंबाजोगाई; डॉ. चंद्रकांत चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र, अंबाजोगाई; तसेच श्री.जिगर कोटेच्या, चेअरमन, ऑल इंडिया हिमोफिलिया फेडरेशन, डॉ.दिलीप गायकवाड, डॉ.माधव केंद्रे, डॉ.शिवराज पेस्टे, सहाय्यक आधिसेविका श्रीमती. कौसरबानू शेख व नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री.श्रीधर भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी टेलिमानस विभागाचे सर्व कर्मचारी आणि परिचर्या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात हिमोफिलिया रुग्ण आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांनाच उद्घाटनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. यावेळी श्री. जिगर कोचेटा यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात हिमोग्लोबिनोपॅथी डे केअर सेंटर सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. अशा केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना एकाच ठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा, उपचार व मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हे केंद्र सुरू करण्यासाठी मा. आयुक्त संजय काटकर यांनी दाखवलेली तत्परता, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रोत्साहन याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके आणि डॉ. अरुणा दहिफळे यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी मा. आयुक्त श्री. संजय काटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले व तदनंतर हिमोफिलिया रुग्णांच्या हस्ते फीत कापून हिमोग्लोबिनोपॅथी डे केअर सेंटरचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. रुग्णांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. या केंद्रामुळे हिमोग्लोबिनोपॅथी आणि संबंधित रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे आणि याची प्रत्यक्ष सुरुवात आजच रुग्णांना उपचार देऊन करण्यात आली
उद्घाटनानंतर मा. आयुक्तांनी वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. केंद्रामार्फत रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबद्दल तसेच याठिकाणी होत असलेल्या विविध शस्त्रक्रिया बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यानंतर वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र, स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र या दोन्ही रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक तसेच शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून मा. आयुक्तांनी प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, प्रशासकीय बाबी आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी सावद व श्रीमती बिराजदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचर्या अधिकारी, कर्मचारी आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
हिमोग्लोबिनोपॅथी डे केअर सेंटरच्या प्रारंभामुळे अंबाजोगाई परिसरातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना विशेष आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, या उपक्रमामुळे रुग्णसेवेला अधिक बळकटी मिळणार आहे.
#आयईसी #मेघनाबोर्डीकर Maha Arogya IEC Bureau