14/03/2026
जांभई "संसर्गजन्य (contagious)" (का) असते?
(आणि हे वाचतानाच तुम्हाला जांभई आली असेल!)
----------------------------------------------------
चला, एक चॅलेंज घ्या. हा पूर्ण ब्लॉग वाचेपर्यंत जांभई देऊ नका. बघू किती जण टिकतात. मला खात्री आहे, की हा ब्लॉग वाचून होईपर्यंत, तुम्हाला जांभई येईल, किंवा जांभई दाबून टाकायची उबळ तरी येईल.
जांभईचा विचार आलाच ना मनात? कदाचित जबडा थोडा हलला असेल. कदाचित एक छोटीशी जांभई दाबून ठेवली असेल. तुम्हाला असं वाटलं ही असेल, की सकाळी सकाळी व्यवस्थित झोप झाली असताना, कॉफी पिऊन ऑफिस मध्ये बसलेला असताना, जांभई का आली?
हे शुद्ध विज्ञान आहे. चला तर मग, मिरर न्यूरॉन्स या भन्नाट विषयात डोकावूया —
----------------------------------------------------
अपघाताने लागलेला शोध, आणि मिळालेलं अमूल्य ज्ञान
साल होतं १९९२. जागा होती इटलीतलं पार्मा शहर, तेच Parma, जिथलं Parmigiano हे चीज जगभर King Of Cheese म्हणून प्रसिद्ध आहे. जियाकोमो रिझोलाट्टी हे न्यूरोसायंटिस्ट व त्यांचे सहकारी माकडांच्या मेंदूतल्या मोटर न्यूरॉन्सचा अभ्यास करत होते. विशेषतः, माकड समोर ठेवलेला खाऊ उचलताना कोणते न्यूरॉन्स सक्रिय होतात हे ते बघत होते. त्यांचा फोकस होता, मेंदू मधील, F५ या Premotor Cortex वर!
मग एक विचित्र गोष्ट घडली.
त्या टीम मधील एका संशोधकाने अचानक समोर ठेवलेला खाऊ उचलला, आणि खायला सुरुवात केली. हा केवळ एक अपघात किंवा, अचानक घडलेली कृती होती, प्रयोगाचा भाग नव्हता. त्यानंतर मात्र जे झालं ते बघून ते शास्त्रज्ञ थक्क झाले. समोर बसलेल्या माकडाच्या मेंदूत तेच न्यूरॉन्स पेटले — जे शेंगदाणा उचलताना पेटायचे! मात्र, यावेळेस, ते माकड हलतही नव्हतं., शेंगदाणा उचलतही नव्हतं, खातही नव्हतं. फक्त बघत होतं. पण त्याचा मेंदू मात्र ती कृती आतून "रिहर्सल" करत होता. जणू त्या संशोधकाच्या कृतीचा सिम्युलेटर चालू होता.
या न्यूरॉन्सना नाव मिळालं: मिरर न्यूरॉन्स. आणि हा आधुनिक न्यूरोसायन्समधला एक रोमांचक शोध ठरला.
मिरर न्यूरॉन्स म्हणजे नक्की काय?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर — मिरर न्यूरॉन्स अशा मेंदूच्या पेशी आहेत ज्या तुम्ही स्वतः काही करता तेव्हाही सक्रिय होतात, आणि दुसरे काही कृती करताना बघता तेव्हाही सक्रिय होतात.
तुम्ही चहाचा कप उचलता — मेंदूतले काही विशिष्ट न्यूरॉन्स पेटतात. तुमचा सहकारी चहाचा कप उचलतो — तेच न्यूरॉन्स परत पेटतात! जणू तुमचा मेंदू शांतपणे बॅकग्राउंडला ती कृती "प्रॅक्टिस" करतोय. इथे प्रश्न पडतो, की मेंदूला हे कळत नाही का, की कप मी उचलत नाहीये, समोरचा उचलतोय?
अर्थात कळतं! मेंदू पूर्णपणे गोंधळलेला नाहीये. आपल्याला माहीत असतं की कप कोणी उचलला. पण न्यूरॉन्सच्या पातळीवर "मी करतोय" आणि "तो करतोय" यातली सीमारेषा आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप धूसर असते.
असं समजा की आपल्या मेंदूत एक बिल्ट-इन मेथड ॲक्टिंग कोच आहे. कोणीही काहीही करताना दिसलं की तो हळूच सांगतो — "हे तूच करत असतास तर कसं वाटलं असतं बघ..."
जांभईचं गूढ (तुम्हाला आत्ताही आली असेल!)
"संसर्गजन्य जांभई" हे मिरर न्यूरॉन्सचं सर्वात दिसणारं — आणि सर्वात गमतीशीर — उदाहरण आहे. कोणी जांभई दिली, तुमच्या मेंदूची मिरर सिस्टीम ऑन झाली, जांभईचं सिम्युलेशन चालू झालं, आणि बघता बघता तुमचं तोंड उघडलं — मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक झोप का आली हे तुम्हालाच कळलं नाही!
पण इथे गोष्ट अजून इंटरेस्टिंग होते: सगळ्यांना सारखीच जांभई लागत नाही.
संशोधनातून दिसून आलंय की जांभई "लागणं" हे empathy सोबत जवळून जोडलेलं आहे. ज्यांच्यात empathy जास्त, त्यांना दुसऱ्यांची जांभई जास्त लागते. चार वर्षांखालच्या लहान मुलांना जांभई क्वचितच 'लागते' — कारण त्यांची empathy सर्किट्स अजून तयार होत असतात. आणि ऑटिझम स्पेक्ट्रमवरील व्यक्ती, ज्यांचा सामाजिक संकेत ओळखण्याचा मार्ग वेगळा असतो, त्यांनाही जांभई कमी लागू शकते.
आणखी एक भारी गोष्ट — जांभई देणारा कोण आहे हेही महत्त्वाचं आहे! जवळच्या मित्राची किंवा जवळच्या व्यक्तीची जांभई आपल्याला लगेच लागते. अनोळखी माणसाची? तेवढी नाही. आपली मिरर सिस्टीम जवळच्या माणसांसाठी जास्त जोरात काम करते.
तर पुढच्या वेळी कोणी म्हणालं "ए, बंद कर जांभई, मलापण येतेय!" — तर समजून घ्या, त्यांचा मेंदू खरं तर सांगतोय: "माझ्या मेंदूने तुझी शारीरिक अवस्था आपोआप कॉपी केली कारण न्यूरल लेव्हलवर मला तुझी काळजी आहे." थोडं लांबलचक आहे, बोरिंग वाटेल, पण सायन्टिफिकली बरोबर आहे! शेल्डन कूपर आणि Amy Farrah Fowler जेव्हा एकमेंकाशी प्रेमाने बोलतील, तेव्हा कदाचित याच भाषेत बोलत असतील.
मिरर न्युरॉन सिस्टिम आपल्याला अजून काही गंमतीशीर किंवा, कधीकधी गंभीर अनुभव पण देत असते. कोणाचा पाय दगडावर आपटला तर आपण "अरेरे !" करतो, हळहळतो. कोणी लिंबू किंवा चिंच चोखताना दिसलं तर आपलं तोंड आंबट होतं, तोंडाला पाणी सुटतं. हॉरर मूव्हीमध्ये कॅरेक्टर त्या भयानक दार उघडणार असतं तेव्हा तुमचं हृदय धडधडतं — जरी आपण सोफ्यावर ब्लँकेट ओढून पॉपकॉर्न खात बसलेले असतो. का?
कारण आपला मेंदू त्यांच्या अनुभवाचं एक लो-रिझोल्यूशन सिम्युलेशन चालवतो. मिरर न्यूरॉन्स — आणि भावना व संवेदनांशी जोडलेले इतर मेंदूचे भाग — मिळून दुसऱ्या व्यक्तीच्या अनुभवाचा एक आतला प्रतिध्वनी तयार करतात. मेंदू मधला VR असं समजा! म्हणूनच दुःखी सिनेमा बघताना डोळे ओले होतात. कोणी हसलं तर आपलंही हसू फुटतं. मित्राचं दुःख आपल्या छातीवर जड बसतं — जरी आपल्याबरोबर काहीही वाईट घडलेलं नसतं.
हाच empathy चा न्यूरल पाया आहे. "दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं" ही फक्त तात्त्विक कल्पना नाही — तुमचा मेंदू खरोखरच, एका मर्यादित पण वास्तव अर्थाने, दुसऱ्याच्या बुटांमध्ये चालतो. आपोआप चालतो. आपण त्याला ते सांगायला लागत नाही.
मेंदूची डीफॉल्ट सेटिंग एकटेपणा नाही — माणसांशी जोडले जाणे आहे.
मिरर न्यूरॉन्स फक्त empathy साठी नाहीत. बघून शिकणं — यातही ते मुख्य भूमिका बजावतात.
नवजात बाळं जन्मानंतर काही तासांतच चेहऱ्याच्या हालचाली कॉपी करू शकतात. बाळासमोर जीभ बाहेर काढा — बाळ स्वतःची जीभ बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. त्याने कधी स्वतःचा चेहरा बघितलेला नाही. जीभ म्हणजे काय हेही माहीत नाही. पण मिरर सिस्टीम "दिसतंय ते" आणि "करता येतं ते" यांना जोडते — आणि जादू होते.
हे इमिटेशन इंजिन आयुष्यभर काम करतं. तुम्ही बोलणं कसं शिकलात? आईवडिलांच्या हालचाली कशा शिकलात? YouTube वर कुकिंग ट्यूटोरियल बघून (बऱ्यापैकी) रेसिपी कशी बनवलीत? कारण कुशल व्यक्ती काही करताना बघता तेव्हा तुमचे मिरर न्यूरॉन्स शांतपणे नोट्स घेत असतात, एक मोटर मॅप तयार करत असतात जो तुम्ही नंतर वापरू शकता. व्यक्ती जितकी जवळची, किंवा ओळखीची वाटणारी, तितकी ही सिस्टीम जास्त चांगली काम करेल.
म्हणूनच क्रिकेट किंवा कोणताही खेळ बघणं इतकं exciting असतं! सचिनने सिक्स मारला तेव्हा तुमचा मेंदू फक्त शॉट बघत नव्हता — तो शॉट सिम्युलेट करत होता. तुम्हाला शारीरिक मेहनतीची, विजयाची, ॲड्रेनालिनची एक हलकीशी झलक जाणवत होती. तुम्ही फक्त प्रेक्षक नव्हता. न्यूरॉन्सच्या भाषेत, तुम्ही त्यात सहभागी होता. रस्त्यावरून चालता चालता अचानक, झहीर खान, किंवा ब्रेट ली सारखी बोलिंग एक्शन करत जाण्याची गंमत आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी केलेली आहे. ही bowling action आपल्याला कुणी शिकवली, आपण कधी त्याची practice केली? हे मिरर न्युरॉन यांचंच देणं!
याचा अर्थ, मिरर न्युरॉन आणि पुढील संशोधनात काही अडचणी, किंवा अडथळे आले नाहीत का? नवीन प्रश्न निर्माण झाले नाहीत का? सगळीच उत्तरे मिळाली का?
अजिबात नाही. त्याबद्दल वाचू, पुढच्या भागात.
तोपर्यंत, विचार करुन बघा, अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही कोणतीही प्रॅक्टिस, सराव, मेहनत न करता आपोआप शिकलात? ती एखादी भाषा असेल, एखादी कला असेल, एखादी कृती असेल, किंवा एखादं कौशल्य असेल. सोबत हा देखील विचार करा, की ते तुम्ही कोणाकडून शिकलात?
-------------------------------------------------------------
सुरुवातीला दिलेलं चॅलेंज आठवतं आहे? जांभई आली? एकदाही नाही आली? आत्ता लिहिलेला जांभई हा शब्द वाचूनही जांभई नाही आली?
मला तरी येतेय. सो आत्ता, इथेच थांबू.
वाचत रहा. नमस्कार.
लेख आवडला तर लाईक आणि फॉलो करायला विसरून नका.